पुण्यात ‘कोरोना’ आटोक्यात का नाही ? टेस्टिंगसाठी आता IAS अधिकारी नेमा : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   लॉकडाऊन शिथिल झाली, म्हणजे आपली जबाबदारी संपली, असं होत नाही. पुण्यासारख्या शहरात कोरोना व्हायरसची साथ आटोक्यात यायला काय अडचण आहे. मुंबईत नियंत्रणात येते, तर मग पुण्यात का नाही ? काही रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षा मध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई करा, अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा दिला. पुण्यात कोरोना चाचण्या पुरेशा प्रमाणात व्हाव्यात म्हणून पुण्यात ‘टेस्टिंग इन्चार्ज’ IAS अधिकारी नेमण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी टेस्टिंग इन्चार्ज म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले.

अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढताना म्हणाले, मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात येऊ शकते मग पुण्यात काय अडचण आहे, मी तुम्हाला आता एकदाच सांगतोय, मला परत.. परत सांगायला लावू नका… नाही तर परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात अजित पवारांनी अधिकाऱ्यांची खडपट्टी काढली.

अजित पवार म्हणाले, कोविड रुग्णांवर उपचार करताना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नये. काही रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षात जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई करा. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार होतांना दिसून येत आहे. ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करा. शहरांतून ग्रामीण आणि ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी.

प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवा. त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या करीता आवश्यक ती कार्यवाही करावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कम्युनिटी लिडर्सची मदत घ्या – अजोय मेहता

पुणे महनगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक करताना परिस्थितीनिहाय कामकाजाचे सूक्ष्म वाटप करण्याची सूचना अजोय मेहता यांनी केली. ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कम्युनिटी डिलर्सची मदत घ्या. लोकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती घालवण्यासाठी जनजागृतीवर भर द्या. हे करताना प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करा. चाचण्यांचे प्रमाण वाढवा. लवकरात लवकर अहवाल प्राप्त करा, जेणेकरून संसर्ग पसरणार नाही. आरोग्य सेतू अॅप मधील माहितीचा प्रभावीपणे वापर करा, यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राची मदत घ्या, अशा सूचना मेहता यांनी दिल्या.

या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, जमावबंदी एस चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.