पुण्यातील कचरावेचक महिलेच्या मनाची ‘श्रीमंती’, ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी 15 हजारांची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मुंबई आणि पुणे शहरात याची तीव्रता जास्त आहे. अशात सर्वात जास्त हाल होत आहेत ते ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांचं. अशा गरजुंना अनेक संस्थांकडून, दानशूर व्यक्तींकडून अन्नधान्याचे वाटप आणि आवश्यक सामानाचे वाटप करण्यात येत आहे. मात्र पुण्यातील एका कचरा वेचणाऱ्या महिलेनं कोरोनाविरुद्धच्या लढाईत १५ हजार रुपयांची मदत केली आहे. या महिलेचं औदार्य सगळ्यांसमोर सरस ठरेल असंच आहे.

गवळणबाईंच्या मनाची श्रीमंती
या दानशूर महिलेचं नाव आहे गवळणबाई मुरलीधर उदगरे. गेल्या २० वर्षांपासून त्या कचरा गोळा करण्याचे काम करतात. उदगरे पुण्यातील धानोरी भागातील भीमनगरमधल्या झोपडपट्टीत राहतात. दिवसभर काबाडकष्ट करून आतापर्यंत साठवलेले पैसे त्यांनी या कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री फंड आणि दोन सेवाभावी संस्थांना देऊ केले आहेत. खरेतर साठवलेल्या पैशाच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीची काही स्वप्न असतात. भविष्याची पुंजी म्हणून आपण पैसे साठवत असतो पण अशा या कोरोनाच्या संकटकाळात आपली स्वप्न विसरून इतरांचा विचार करणाऱ्या गवळणबाईंच्या मनाच्या श्रीमंतीचं कौतुक करावे तितके थोडेच आहे.

जगलो तर अजून कमावता येईल…
“माझं वय साठ वर्षांच्या वर आहे. पण असं संकट कधी पाहिलं नव्हतं,” असं त्या म्हणाल्या. यावेळी देशासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. “आपण जगलो तर पुढे अजून कमावता येईल, पण आता लोकांना मदत होणं गरजेचं आहे,” असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या या संकटातही त्या कचरा वेचण्याचं काम करतच आहेत. “धोका आहे म्हणून जर सगळेच घरात बसले तर कम कसं होणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला. अशा परिस्थीतीमध्येही त्यांचं धैर्य आणि इच्छाशक्ती कमी झालेली नाही. कोरोनोवर मात करण्यासाठी सध्या अशाच शूरवीरांची गरज आहे.

राज्यातील आकडा २४५५ वर
राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. राज्यात सरासरी १०० कोरोनाचे रुग्ण रोज आढळत आहेत त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान गेल्या १२ तासात १२१ कोरोना बाधित रूग्ण आढळले असून राज्यातील एकूण करोना बाधितांची संख्या २४५५वर गेली आहे.