Coronavirus : कोरोनाचा धसका ! ‘या’ राज्याने 1 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला

चंदिगड :  वृत्तसंस्था –  जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन हाच एक उपाय असल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. भारतात देखील 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून 14 एप्रिल रोजी लॉकडाऊनची मुदत संपत आहे. मात्र, काही राज्यांनी आपला लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. तर काही राज्यांनी केंद्राकडे लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे. परंतु केंद्र सरकारच्या निर्णया आधीच पंजाब सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाबमध्ये 1 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शुक्रवारी (दि.10) याबाबत माहिती दिली. पंजाबमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात 100 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही खबरादारी घेतली असल्याची माहिती मिळत आहे. पंजाबमध्ये 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 4 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.

तबलिगींना 24 तासांची

मरकज प्रकणामुळे अनेक राज्यांची डोकेदुखी वाढली आहे. याती काही जणांपर्यंत प्रशासन पोहचले आहे तर काही जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. पंजाबने तबलिगींना इशारा देताना 24 तासात स्वत:हून समोर येण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा गुन्हे दाखल केले जातील असे पंजाब सरकारने तबलिगींना सांगितले आहे. पंजाबच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यात लपून बसलेल्या तबलिगींना 24 तासात जवळच्या पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. जे पोलीस ठाण्यात हजर होणार नाहीत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील असे पत्रकच काढले आहे.

यापूर्वी ओडिशाने वाढवला लॉकडाऊन

ओडीशा सरकारने 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. देशात लॉकडाऊन वाढवणारे ओडिशा हे पहिले राज्य आहे. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी ओडिशा सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा 17 जूनपर्यंत बंद राहतील अशी माहिती मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे 30 एप्रिलपर्यंत रेल्वे व हवाई सेवा सुरू न करण्याची विनंती देखील पटनाईक यांनी केंद्राकडे केली आहे.