धक्कादायक ! लग्नात सहभागी झालेल्या 95 जणांना कोरोना; वधू पित्याचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता राजस्थानात लग्न समारंभात सहभागी झालेल्या 95 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

राजस्थानच्या झुंझनू जिल्ह्यातील स्यालू गावात ही घटना घडली. या गावात एक विवाह सोहळा झाला. त्यामध्ये 150 लोक सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या 95 लोकांची कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. इतकेच नाहीतर लग्नादरम्यान वधू पित्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्यालू कला गावातील सुरेंद्र शेखावत यांनी सांगितले की, जेव्हा या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली तेव्हा यातील 95 जण कोरोनाबाधित आढळले. 25 एप्रिलला तीन विवाह सोहळे पार पडले. यादरम्यान वधू पित्याचा मृत्यू झाला. गावातील लोक कोरोना मानत नाहीत. ते असे बिनधास्तपणे फिरतात. जेव्हा सर्वांची तपासणी करण्यात आली तेव्हा भीतीचे वातावरण परसले होते. लोक आपल्या घरात बसून होते. गावात शांतता पसरली होती. रस्ते ओसाड पडले होते. मुले आपल्या घरात बंद होते. लोक फक्त आवश्यक काम असल्यानेच बाहेर पडत होते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राजस्थान सरकारने लग्न समारंभात उपस्थित राहण्यासाठी फक्त 11 लोकांनाच परवानगी दिली आहे. नियमभंग केल्यानंतर 1 लाखाचा दंड आकारला जाईल, असे सांगण्यात आले. तसेच या नियमांकडे लोक दुर्लक्ष करत असतील तर दुसऱ्या लोकांनाही याचा फटका बसू शकणार आहे.