फक्त जिद्द ! ‘कोरोना’वर मात करणार्‍या 98 वर्षांच्या जवानाला नौदलातील अधिकार्‍यांनी दिला ‘या’ पध्दतीनं निरोप

नेरुळ : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असला तरीही जिद्दीनं त्यावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशाच एका 98 वर्षाच्या सेवानिवृत्त जवानाने कोरोना विरुद्धची लढाई जिंकली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या जवानाला रुग्णालयातून निरोप देण्यासाठी नौदलातील अधिकारी आणि शिपायी उपस्थितीत होते. रामू लक्ष्मण सकपाळ असे कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकलेल्या 98 वर्षीय जवानाचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी सकपाळ यांची कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नेरुळच्या नौदलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांनी मुंबईच्या आयएनएचएस अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 98 वर्षीय सकपाळ यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर निमोनिया देखील झाला होता, अशी माहिती नौदलाने दिली आहे.

सकपाळ हे भारतीय सैन्यदलातील महार रेजिमेंटमधील सेवानिवृत्त शिपाई आहेत. त्यांची नौदलातील अधिकाऱ्यांनी योग्य रितीनं काळजी घेतली. त्यामुळे कोरोनाविरुद्ध मात करणं अधिक सोपं झाल्याचं सांगितलं. अत्यंत गंभीर अवस्थेतून सकपाळ यांनी जिद्दीच्या जोरावर हे युद्ध जिंकल्याने त्यांचे अधिकारी आणि शिपायांनी रुग्णालातून बाहेर पडताना स्वागत केले. टाळ्या आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला. त्यांच्या जिद्दीमुळेच त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याचे नौदलानं सांगितलं आहे.

आयएनएचएस अश्विनी हे नौदल, हवाई दल, सैन्य दलातील जवानांसाठी कार्य करत आहे. कोरोनाची लागण झालेल्या जवानांवर सध्या याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या ठिकाणचे अधिकारी आणि जवान त्यांची चांगल्या पद्धतीने काळजी घेत असल्याची माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली.