Corona Lockdwon : रिझर्व्ह बँकेकडून शेती, लघु उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी 50 हजार कोटींचे पॅकेज

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शेती, छोटे उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात नाबार्डला 25 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. सीआयडीबीआयला 15 हजार कोटी आणि एनएचबीला 10 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

नाबार्डकडून शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा केला जातो. एसआयडीबीय छोटया उद्योगांशी संबंधित असलेली बँक आहे. तर एनएचबी गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित असलेली बँक आहे. या संस्थांबरोबर झालेल्या चर्चेच्या आधारावर ही आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. रिव्हर्स रेपो रेट 25 बेसिक पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्के ठेवण्यात आला आहे.

जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये चांगली स्थिती आहे. यावर्षी 1.9 टक्के विकास दर राहण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर विकास दर 7.2 टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो असे शक्तीकांत दास म्हणाले. सध्या मानवतेसमोर करोना व्हायरसचे संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले.