Coronavirus : दिलासादायक ! राज्यात 24 तासात सर्वाधिक 8381 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, 116 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे चिंता वाढली असताना एक दिलासादायक बातमी आज समोर आली आहे. राज्यात 24 तासात विक्रमी 8,381 रुग्ण कोरोनामुक्त झाल आहेत. तर आतापर्यंत एकुण 26 हजार 997 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आणखी दिलासा देणारी बाब म्हणजे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 43.38 टक्के झाले आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11 दिवस होता, तो आता 15.7 दिवस झाला आहे. तसेच मृत्यूदर सुद्धा 3.37 टक्के खाली आला आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत असतानाच काही दिलासादायक गोष्टी समोर आल्याने लवकरच कोरोनावर मात करणे शक्य होऊ शकते, अशी आशा निर्माण झाली आहे. कारण आज कोरोनाला हरवून बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यातील सर्वाधिक 7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. प्रथमच एवढे बरे झालेले रूग्ण घरी सोडण्यात आले आहेत. राज्यभरात आतापर्यंत 26 हजार 997 रुग्ण बरे झाले आहेत.

मागील 24 तासात करोनाने 116 जणांचा मृत्यू झाला. तर 2 हजार 682 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण रुग्णसंख्या 62 हजार 228 झाली आहे. तर प्रत्यक्षात 33 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.