Coronavirus : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.79 %

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा देशात राज्यात प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात मंगळवारी ११ हजार ८८ कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ झाली. तर दिवसभरात २५६ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या १८ हजार ३०६ झाली आहे. राज्याच्या रिकव्हरी रेट वाढला असून तो ६८.७९ टक्के इतका झाला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे. तर मंगळवारी १०,०१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण उपचारनंतर बरे झाले आहेत. राज्याचा मृत्यूदर ३.४३ टक्के इतका झाला आहे.

मुंबईत लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट

मुंबईमधील रुग्णवाढीचा प्रमाण कमी होत असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच रोज नव्याने भर पडणाऱ्या रुग्णांपेक्षा दरदिवशी कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या देखील घटू लागली आहे. मंगळवारी ९१७ नवीन रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा १ लाख २५ हजार २३९ वर गेला आहे. दिवसभरात १,१५४ रुग्ण एका दिवसात बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ९९ हजार १४७ रुग्ण म्हणजेच ७९ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मृत्यूदर वाढताच

मुंबईला सर्वात मोठी चिंता आहे ती वाढता मृत्यूदर रोखण्याची. मंगळवारी ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यातील ३३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ३७ पुरुष व ११ महिला होत्या. २५ रुग्णांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. मृतांचा आकडा ६,८९० वर गेला आहे. त्यापैकी ५,६५० रुग्णांचे वय हे ५० वर्षांहून अधिक होते.