दिलासादायक ! राज्यात ‘कोरोना’चे रुग्ण ‘बरे’ होण्याचे ‘प्रमाण’ साडेतीन पटीने ‘वाढले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्यात सोमवारी 779 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 70 हजाराच्या वर गेली असून राज्यातील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले आहे.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे महिन्यात साडेतीन पटीने वाढून 43.35 टक्के इतके झाले आहे. गेल्या तीन महिन्यांच्या आकडेवारी पाहता मे महिन्यामध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झाल्याचे दिसून येत आहे. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 11 वरून 17.5 दिवसांवर गेला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पहिले रुग्ण आढळल्यानंतर 31 मार्च अखेर राज्यात 302 रुग्ण होते. त्यातील 39 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. म्हणजे मार्च महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण 12.91 टक्के होते. एप्रिलमध्ये राज्यात 10 हजार 498 रुग्ण होते. त्यातील 1773 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एप्रिलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 16.88 टक्के इतके होते.

राज्यात 31 मे अखेर 67 हजार 655 रुग्णांपैकी 29 हजार 329 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे मे अखेरीस राज्याचा रिकव्हरी रेट मार्चच्या तुलनेत साडे तीन पटीने वाढत 43.35 टक्के झाला आहे. राज्य शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजना, लागू केलेले लॉकडाऊन, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे त्याचसोबत केंद्र शासनाने सुधारीत डिस्चार्ज पॉलिसी जाहीर केल्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एकाच दिवशी आठ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचा विक्रम नोंदवण्यात आला असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.