Covid-19 : आढावा बैठक सुरु असतानाच उपमुख्यमंत्र्याच्या नाकातून आले रक्त

आग्रा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये युद्ध स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. याच प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी बैठक बोलावली होती. बैठक सुरु असतांनाच त्यांच्या नाकामधून रक्त येऊ लागल्यामुळे खळबळ उडाली. डॉक्टरांच्या तपासणीनंतर शर्मा यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

उपमुख्यमंत्री शर्मा यांनी जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी सक्रिट हाऊसवर बैठक बोलावली होती. बैठकीला जिल्हाधिकार्‍यांसह सर्व जण हजर होते. बैठक सुरु असतांनाच उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली त्यामुळे सगळेच अधिकारी घाबरले. तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी शर्मा यांची तपासणी केल्यांनतर काळजीचे कारण नसल्याचे सांगितले. काही वेळातच त्यांना बरे वाटल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शर्मा यांचं ब्लड प्रेशर आणि इतर गोष्टी सामान्य आहेत अशी माहितीही डॉक्टरांनी दिली. नाक कोरडे पडल्याने रक्त आले असल्याची शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शर्मा यांनी बैठक पूर्ण केली आणि लोकप्रतिनिधींशींही चर्चा केली. त्यानंतर ते पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले.