सावधान ! ‘कोरोना’तून बरे झाल्यानंतरही ‘फायब्रोसीस’चा धोका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आहे. जगभरात आतापर्यंत ३५ कोटी रुग्ण सापडले असून भारतात देखील १ लाख रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या आजारातून बाहेर आल्यानंतर कोरोना रुग्णांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये ‘फायब्रोसीस’ म्हणजेच फुफ्फुसाचे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. फुफ्फुसाचे इन्फेक्शन अनेक रुग्णांना होत असून १० ते २० टक्के रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागत आहे.या आजारामध्ये रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र मोठ्या प्रमाणात त्रास जाणवायला लागल्यानंतर रुग्ण याकडे लक्ष देतात.

डॉक्टरांनी सांगिलेल्या माहितीनुसार, या रुग्णांच्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण देखील कमी होते. या आजाराचे निदान हे रुग्णाला न्यूमोनिया झाल्यानंतर फायब्रोसीसचा त्रास सुरू होतो. त्याचबरोबर फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईड यांच्या प्रक्रियेमध्ये त्रास व्हायला लागतो. यामध्ये रुग्णांना श्वास घेताना त्रास होणे, धाप लागणे, खोकला येणे, थकवा जाणवणे यांसह श्वसनाचा त्रास देखील होतो. त्यामुळं त्रास जाणवायला लागल्यानंतर रुग्णांनी तात्काळ डॉक्टरकडे जायला हवे. कोरोनामध्ये न्यूमोनिया झाल्यामुळं रुग्णांच्या फुफ्फुसांना मोठा धोका पोहोचतो. यामध्ये सुरुवातीला रुग्णांना कोरडा खोकला, थकवा, अचानक वजन कमी होणे, नैराश्य यांसारखी काही लक्षण जाणवायला लागतात.

काय काळजी घ्यावी
कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोनाची लक्षण आढळल्यास तात्काळ डॉक्टरकडे जावे. त्याचबरोबर ताप येणे, हगवण लागणे, कोरडा खोकला, तोंडाची चव जाणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. महत्वाचं म्हणजे कोरोनातून बरे झाल्यानंतर दीड महिन्यांनी पुन्हा कोरोना होण्याची शक्यता असते. अ‍ॅन्टीबॉडिज तयार झाल्यानं दीड महिना याचा धोका नसतो, मात्र वृद्ध व्यक्तींना पुन्हा कोरोना होण्याचा धोका अधिक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. त्यामुळं लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ उपचार घ्यावेत अन्यथा याचे न्यूमोनिया मध्ये रूपांतर होत असल्याचं अकोल्याचे फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. सागर थोटे यांनी म्हटलं आहे.