देवेंद्र फडणवीसांवर रोहित पवारांची टीका, भाजपा आमदारासोबत झाली ‘तू तू मै मै’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरलं असल्याचं निवेदन दिल आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

रोहित पवार यांनी फडणवीसांना ट्विट करत उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस जी, आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्वाचे असून त्यावर महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधन योग्य ठरू शकेल असं मत त्यांनी व्यक्त केलं.

तसेच काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी केंद्र सरकारला कृषीविषयक ठोस धोरण जाहीर करण्याबाबत पत्र पाठवले होते. त्यावर फडणवीसांनी म्हटलं होत की, शरद पवार यांनी एखाद पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा पाठवावं. याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, पवारांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच मार्गदर्शक ठरत असत. त्यामुळे या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याच आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल असं मला वाटत असा चिमटाही रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला.

दरम्यान, रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेल्या या टीकेला भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे हे महत्वाचे असून, आपण मान्य केलं हे योग्यच झालं. भाजपाने मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याला अशी स्वयंअग्रेषित उत्तर येतात असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री कार्यलयाला पाठवलेला ई-मेल जोडला. तसेच मागूनही वेळ मिळत नसेल तर काय करणार? शरद पवारांच्या मार्गदर्शनाची गरज राज्याला अधिक आहे. हे राज्याच्या सध्याच्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे असा टोला हाणला.

त्यावरती रोहित पवारांनी कोरोना संसर्गाच्या संकटाशी संपूर्ण राज्य अहोरात्र लढण्यात व्यस्त असताना एकच दिवस आधी केलेल्या पत्रव्यवहाराचा योग्य रिप्लाय प्राप्त होण्यासाठीचा संयम नक्कीच आपल्याकडे असेल, अशी अपेक्षा मी आपल्या सारख्या अनुभवी नेत्याकडून करतो. त्याचसोबत कोणत्याही पक्षाचं सरकार असो, राज्यातील असो की केंद्रातील असो, जनतेच्या हितासाठी राजकारण न करता शरद पवार साहेब अनुभवाच्या बळावरती नेहमीच अधिकारवाणीने सर्वानाच मार्गदर्शन करतात असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं.