बीड जिल्हा रूग्णालयात ‘करोना’ व्हायरस कक्ष ; 4 कॉट, 1 व्हेंटीलेटर आणि 10 कर्मचारी सज्ज

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात धुमाकुळ घातलेल्या करोना व्हायरस मोठ्या गतीने पसरू लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात आणि अतिरीक्त शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी येथील जिल्हा रूग्णालयात करोना व्हायरस कक्ष स्थापन केला आहे. ४ कॉट, १ व्हेंटीलेटर आणि १० कर्मचारी, आवश्यक औषधी सज्ज ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नागरीकांनी करोना व्हायरसला घाबरू नये, खबरदारी घ्यावी असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले आहे.

बीड येथील जिल्हा रूग्णालयात आज सकाळी कोरोना व्हायरस कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्ष स्थापन केला याचा अर्थ व्हायरस बीडमध्ये आला असे नाही. खबरदारीचा उपाय म्हणुन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी सांगीतले आहे.

दिवसांतुन अनेकदा साबणाने हात धुवा, आपल्या हाताने डोळे, नाक, किंवा तोंडाला हात लावु नका, तुमचे आणि कुटुंबाचे आरोग्य व्यवस्थीत राहिल याची काळजी घ्या आणि तेच सेवन करा, खोकताना आणि शिंकताना तोंड व्यवस्थीत झाका, कोणत्याही संक्रमीत व्यक्तीच्या संपर्कात आल्यास पाळीव जनावरांच्या संपर्कात येणे टाळा, खोकला, ताप आणि सर्दीचे लक्षण असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा असे आवाहन डॉ. थोरात आणि गायकवाड यांनी केले आहे.