दिलासादायक ! ‘कोरोना’ची मानवी चाचणी यशस्वी, ’हा’ देश कोरोना लसीकरणासाठी तयार ?

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सगळ्यांचे लक्ष लस तयार करण्यासाठी सुरू असलेल्या संशोधनाकडे लागले आहे. त्यातच ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या चाचणीचे तिसर्‍या टप्प्यातले निष्कर्ष उत्साहवर्धक आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता आशा उंचावल्या आहेत.

एका बाजूला ऑक्सफर्ड विद्यापीठाने लसच्या संशोधनात आघाडी घेतली आहे. तर, दुसरीकडे रशियाच्या संरक्षण विभागाने तयार केलेल्या कोरोना विषाणूवरील लसची दुसर्‍या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे, असे सांगितले आहे.

कोरोना विषाणूच्या विळख्यात संपूर्ण जग सापडले आहे. सुमारे दीड कोटी लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत सुमारे सहा लाख जणांना कोरोनाची लागण झाल्याने जीव गमवावा लागला आहे.

लसच्या चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात हजारो लोकांवर चाचणी घेण्यात येणार आहेत. यात रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातचा समावेश असणार आहे. 3 ऑगस्टपासून ही चाचणी सुरू होण्याची शक्यता वर्तविली आहे. सप्टेंबरपासून या लसीचे वितरण सुरू होणार आहे, अशी माहिती आरडीआयएफचे प्रमुख किरिल्ल डिमित्रेव्ह यांनी मागील आठवड्यात दिली आहे.

रशियाच्या संरक्षण विभागाने तयार केलेली लस लवकरच वापरता आणली जाईल, अशी माहिती रशियाचे प्रथम उपसंरक्षण मंत्री रुसलॅन तसालिकोव यांनी नुकतीच दिली. त्यामुळे रशियात लवकरच लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रशियात तयार केलेल्या कोरोना लसच्या दुसर्‍या टप्प्यातल्या मानवी चाचण्या काल संपल्या आहेत. लस टोचण्यात आलेल्या सर्व व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे, अशी माहिती रुसलॅन तसालिकोव यांनी दिली आहे.

लसच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणी नेमकी कधी सुरू होणार? आणि या लसीचे उत्पादन कधी सुरू होणार? याची माहिती मात्र तसालिकोव यांनी दिली नाही.

यावर अद्याप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने कोणतेही भाष्य केले नाही. सध्या कोरोना लसीच्या चाचण्या तयार सुरू आहेत, असेच वृत्त इंटरफॅक्स वृत्तसंस्थेने दिले आहे.

’या लसची तिसरी टप्प्यातील चाचणी अद्याप सुरू झालेली नाही. तशी कोणतीही घोषणा देखील झालेली नाही. मात्र, तरी त्यांना इतकी घाई का?, हे पूर्णपणे अनाकलनीय आहे,’ असे सरकारच्या विषाणूशास्त्र विभागातून कार्यकारी पदावरून निवृत्त झालेल्या सेरगेई नेतेसोव यांनी म्हटले आहे.

रशियन लष्कर सरकारच्या अखत्यारित येणार्‍या गमालेया संस्था आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून कोरोना विषाणूवरील लस तयार करत आहेत.

लसीकरण्याची घाई का ?
लसीकरण्याची घाई रशिया का करत आहे? असा प्रश्न आता पडल्याशिवाय राहणार नाही. कारण, बर्‍याच देशात राजकीय मंडळी लस तयार करण्यासाठी संशोधकांवर दबाव आणून आपल्या सत्तेच्या काळातच त्याचा लाभ नागरिकांना देऊन पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा डाव आखत असल्याचे समजत आहे. मात्र, कोणतीही लस वैज्ञानिक टप्प्यातून गेल्याशिवाय त्याचा थेट अवलंब मानवावर करणे, खूप हानिकारक ठरणार आहे. त्यामुळे लस तयार झाली असली किंवा लसीचे काही टप्पे पार झाले असले तरी, त्याचे काही दूरगामी परिणाम होतात का? याचे निरीक्षणही करणे गरजेचे आहे. याअगोदरच लसीकरण करण्यात आले तर कोरोनासारखा दुसरा आजार किंवा त्याचे दुष्परिणाम मानवावर झाले तर काय करणार? असा प्रश्न देखील अनेकाना पडत आहे.