Coronavirus : सांगलीत होम ‘क्वॉरंन्टाईन’ लोकांचे ‘जिओ टॅगिंग’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात दिवसेंदिवस कोरोना वेगाने पसरत आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेकांकडून खबरदारीचा उपाय म्हणून घरी बसणे पसंत केले जात आहे. मात्र, दुसर्‍या गावाहून आलेल्यांकडून भटकंतीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अशा नागरिकांना होम क्वॉरंन्टाईन करुन जिओ टॅगिंग केले जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि खबरदारी म्हणून सांगली जिल्ह्यात काही कडक नियम उचलण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यात आता प्रत्येक व्यक्तीला मास्क हे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न घालता आणि विनाकारण रस्त्यावर येणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर हे निर्णय जाहीर केले आहेत.

मास्क अनिवार्य करण्याबरोबरच आंतरजिल्हा आणि आंतरराज्य सीमांवर आणखी कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. वारंवार विनाकारण येणार्‍या वाहनांवर जप्ती केली जाणार आहे. सांगली जिल्ह्यात 90 टक्के लोक हे होम क्वॉरंन्टाईनचे पालन करत आहेत. मात्र 10 टक्के लोक हे होम क्वॉरंन्टाईनचे पालन करत नाहीत, होम क्वॉरंन्टाईन लोकांचे जिओ टॅगिंग केल गेले आहे, त्यांच्या हालचालीवर पोलिसांचे लक्ष आहे, जे लोक क्वॉरंन्टाईनच पालन करणार नाहीत, अशांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याशिवाय बँकांच्या बाहेर गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक बँकेने एक सोशल डिस्टन्सिंग मॅनेजर आणि दोन कर्मचारी नेमावेत,तशा लेखी सूचना बँकांना देण्यात आले आहेत.