Sanjay Raut : ‘आता देशातही महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच काम करावे लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : देशात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग चिंतेचे कारण ठरत आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. त्यानंतर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. ‘कोरोना काळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र, या काळात सर्वोत्तम काम महाराष्ट्रातच होत आहे. त्यामुळे आता देशातही महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच काम करावे लागेल’, असे संजय राऊत म्हणाले.

राज्यासह देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. पण तरीही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘देशाला महाराष्ट्र मॉडेलप्रमाणे काम करावे लागणार आहे. कोरोनाकाळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र, महाराष्ट्रातच सर्वोत्तम काम झाले. आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र ज्या पद्धतीने संकटांशी सामना करत आहे, त्याची सर्वांनाच दखल घ्यावी लागेल’.

दरम्यान, देशातील आजची परिस्थिती पाहता हे राष्ट्रीय संकटच आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे, चर्चेमध्ये या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची सातत्याने मागणी करत आहेत. तसेच ही परिस्थिती राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे आता या कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.