पुणे : नायडू रुग्णालयात आणखी 10 संशयित रुग्ण, तपासण्या सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता भारतात देखील आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. आता पुण्यातही आणखी १० जणांना कोरोना सदृश्य लक्षणांमुळे नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे भरती केलेल्या रुग्णांची संख्या आता ९० पर्यंत पोहचली आहे. या दहा जणांचा चाचणी अहवाल मिळालेला नाही.

नायडू रुग्णालयात संशयितांवर तपासण्या सुरु

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, नायडू रुग्णालयात मध्यरात्री अमेरिका, कोरिया, इटली, जर्मनी, स्वीडन, सिंगापूर या देशातून परदेश दौरा करून आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे होती. त्यामुळे हे प्रवासी रुग्णालयात दाखल झाले. त्यांना स्वतंत्र कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत ९० जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ८० जणांना घरी सोडण्यात आले. १८१ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. १२५ जणांची तपासणी बाकी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

लोणावळा, सोलापुरात कोरोना रुग्ण असल्याची अफवा

पुणे जिल्ह्यातील लोणावळा तसेच सोलापूर जिल्ह्यात ‘करोना’चे रुग्ण आढळल्याची अफवा दिवसभर वाऱ्यासारखी पसरली. त्याबाबत आरोग्य खात्याने स्पष्टीकरण दिले आहे. सोलापूर तसेच लोणावळा येथे करोनाचे कोणत्याही प्रकारचे रुग्ण आढळले नाही. त्या अफवा असून त्यावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

विमानतळांवर अधिक सतर्कता

दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५८६ विमानांमधील ६९,५०२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व करोनाबाधित देशातील प्रवाशांची विमानतळावरच तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू होणार आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ४७४ प्रवासी आले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १८७ जणांना भरती करण्यात आले आहे. भरती झालेल्या १८७ प्रवाशांपैकी १७० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.