Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर आता महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील शाळा पुन्हा बंद !

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठवड्यापासून कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यातील शाळा घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार, पाचवी ते नववीपर्यंतचे सर्व वर्ग घेण्यावर बंदी असेल.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागांतील शाळा बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या 5 वी ते 9 वी पर्यंतच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसेच खाजगी शैक्षणिक केंद्रे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

ऑनलाईन क्लास असेल सुरु
दरम्यान, या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यापूर्वीप्रमाणेच ऑनलाईन क्लासेस घेतले जातील आणि शिक्षण सुरु असेल, असे सांगितले आहे. याशिवाय शासन निर्णयानुसार, 50 टक्के शिक्षकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.

औरंगाबादेतील शाळाही बंद
याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील शाळांमधील उपस्थितीबाबत कोणतेही बंधन नसणार आहे. पाचवी ते नववी या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग बंद असतील. पण दहावी-बारावीचे वर्ग सुरु असतील असेही सांगितले आहे.

दहावी, बारावीचे वर्ग सुरुच राहणार
पाचवी ते नववीचे वर्ग बंद असले तरीही दहावी, बारावीचे वर्ग यापुढेही सुरुच राहणार आहेत. मात्र, राज्य शासनाने कोरोना व्हायरससंदर्भात जी काही नियमावली लागू केली आहे. त्याचे पालन करण्याचे सांगितले आहे.

अमरावती, अकोला येथे लॉकडाऊन ?
अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांत लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले आहेत.