Coronavirus : ‘कोरोना’चा धोका वाढला, मुंबईत 140 ‘रहिवासी’ भाग ‘सील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा फैलाव वेगाने वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या 140 रहिवासी भाग पालिकेने सील केले आहेत. अशाप्रकराची कारवाई नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली याठिकाणी देखील करण्यात आली आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये मागील दोन दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्यामुळे या रुग्णांचे वास्तव्य असलेल्या परिसरांना पालिकेने सील केले आहे. कोरोनाचा फैलाव इतरत्र वाढू नये यासाठी ही कारवाई प्रशासनाने केली आहे. काल कोळीवाडा येथील परिसरात कोरोनाचे काही संशयित सापडल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता. तर गोरेगावमधील बिंबिसारनगर या परिसरात देखील कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर हा परिसर लॉक करण्यात आला होता. दरम्यान मुंबईत आतापर्यंत सुमारे 140 रहिवासी भाग सील करण्यात आले आहेत.

राज्यभरात मंगळवारी 82 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 302 झाली. नवीन रुग्णांमध्ये 59 रुग्ण मुंबईचे आहेत. 13 रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर 5 रुग्ण पुणे, 3 रुग्ण अहमदनगर आणि 2 बुलढाणा येथील आहेत.