Coronavirus Vaccine : जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लस येणार, ‘कोव्हिशिल्ड’च्या मानवी परीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या कोरोना लशीची दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी बुधवारी सुरु झाली. कोरोना प्रतिबंध लशीचा पहिला डोस सर्वप्रथम पुणे शहरातील दोन स्वयंसेवकांनाच देण्यात आला आहे. ‘भारती हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर’ येथे या चाचणीला सुरुवात झाली असून बुधवारी लस टोचून घेतलेल्या दोन्ही स्वयंसेवकांना २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे.

भारती रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी, रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. अस्मिता जगताप, डॉ. जितेंद्र ओसवाल आणि डॉ. सोनाली पालकर यांच्या उपस्थितीत रुग्णालयातील चाचण्या सुरु करण्यात आल्या. दोन्ही स्वयंसेवकांना प्राथमिक वैद्यकीय चाचण्या करुन लशीचा अर्धा मिलिलिटर डोस देण्यात आला. दोन्ही स्वयंसेवक पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे ३२ आणि ४७ वर्ष आहे. पहिला डोस दिल्यानंतर ५७ व्या दिवशी (ऑक्टोबर महिन्यात) तपासणीकरता बोलवण्यात येईल. ९० दिवसांनी (नोव्हेंबर महिन्यात) त्यांच्यात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडी तयार झाल्या का, आरोग्याच्या इतर तक्रारी हे पाहिले जाईल. १८० दिवसांनी (फेब्रुवारी महिन्यात) त्यांना रुग्णालयात बोलवून लशीची यशस्विता तपासली जाणार आहे.

पुढील सात दिवसांत २५ स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे. देशातील शंभर जणांना ही लस टोचवण्यात येईल. त्यासाठी १८ वर्षावरील निरोगी स्त्री-पुरुषांची निवड करण्यात येणार आहे. स्वयंसेवक निवडताना प्रथम त्यांची आटीपीसीआर आणि अँटीबॉडी तपासणी करण्यात येणार आहे. आता मानवी चाचणी करता ३०० जणांनी नोंद केली असून, त्यापैकी ७५ टक्के जणांना ‘कोव्हिशिल्ड’ लस तर २५ टक्के लोकांना प्लासेबो इफेक्ट मिळणार आहे. शेवटच्या टप्प्यात दीड हजार जणांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर अहवाल शासनाला पाठवला जाणार असून, प्रत्यक्ष लस बाजारात येण्यासाठी जानेवारी उजाडणार असल्याची माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी दिली.

मानवी चाचणीतील टप्पे

लशीचा पहिला डोस : २६ ऑगस्ट
लशीचा दुसरा डोस : २४ सप्टेंबर
अँटीबॉडी तयार होण्याची प्रक्रिया, लशीचे दुष्परिणाम याबाबत तपासणी : २४ नोव्हेंबर
१८० व्या दिवशी शेवटची तपासणी : २४ फेब्रुवारी