Coronavirus : देशात कोरोनाची दुसरी लाट येणार ? , नीती आयोगानं दिला ‘हा’ धोक्याचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या नियंत्रणात येत आहे. आता देशात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा ८ लाखांपेक्षा कमी आहे. जरी रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका मात्र कायम आहे. लवकरच देशभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका, नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी वर्तवला आहे.

‘गेल्या तीन आठवड्यांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली आहे. रुग्ण मृत्युमुखी पडण्याचं प्रमाणदेखील कमी झालं आहे. अनेक राज्यांमधील स्थिती नियंत्रणात आली असल्याचं’ असे कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या टीमचे नेतृत्व करणाऱ्या व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.

तद्वतच केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालसोबत ३ ते ४ केंद्रशासित प्रदेशांत कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं पॉल यांनी सांगितलं. ‘कोरोना विरुद्धच्या लढाईत देश सध्या चांगल्या स्थितीत आहे. पण संकट अजूनही कायम आहे,’ असे पॉल म्हणाले. हिवाळ्याच्या दिवसांत देशात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते का, असा प्रश्न विचारला असता पॉल यांनी युरोपमधील स्थितीचा अहवाल देत म्हटलं की, ‘हिवाळा सुरु होताच युरोपमधील कोरोना संसर्गित रुग्णाची संख्या वाढली. यामुळे हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढू शकतो.’

‘कोरोनाची दुसरी लाट देशात येणारच नाही, असे म्हणता येणार नाही. हिवाळा सुरु होताच उत्तरेकडील राज्यात प्रदूषण वाढते. त्यात आता देशात सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचं आहे. पुढील काही महिने आव्हानात्मक असतील. काळजी न घेतल्यास आजवर कमावलेल्या गोष्टी गमावण्याची वेळ येईल,’ अशी भीती पॉल यांनी बोलताना व्यक्त केली.