इटलीत ‘कोरोना’चा पुन्हा हाहाकार ! एकाच दिवसात 993 जणांच्या मृत्यूची नोंद

रोम : वृत्तसंस्था –कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा सहन केलेल्या इटलीमध्ये आता दुसरी लाट आल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. इटलीमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असून गुरुवारी (दि. 3) एकाच दिवसांत 993 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती आहे. त्यामुळेच आता इटली सरकारने कठोर नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे.

पंतप्रधान गिसेप कॉन्टे म्हणाले की, ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त होणारी पार्टी, जल्लोषाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. त्याशिवाय आता नागरीक एका शहरातून दुसऱ्या शहरातही जाऊ शकत नाही. एकाच दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नवीन नियमांनुसार फक्त कामगारांना एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यास परवानगी आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे 58 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी इटलीत 23 हजार नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर जगभरातील करोनाबाधितांची संख्या 6 कोटी 48 लाखांहून अधिक झाली आहे. त्यापैकी चार कोटी 53 लाख जणांनी करोनावर मात केली आहे. तर,15 लाख 11 हजार जणांना प्राण गमवावे लागले आहे.

अमेरिकेतही कोरोनाचा थैमान
अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. अमेरिकेत एकाच दिवसात दोन लाख 10 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर एकाच दिवसात आढळलेल्या कोरोनाबाधितांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. जगभरात अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधित आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली. गुरुवारी गेल्या 24 तासात दोन लाख 10 हजार नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, दोन हजार 907 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटी 40 लाख झाली आहे. तर, मृतांची संख्या दोन लाख 50 हजारांहून अधिक झाली आहे.

You might also like