Coronavirus : शाहीन बाग बनला ‘कोरोना’चा नवीन हॉटस्पॉट, दिल्लीमध्ये 24 तासांमध्ये 62 नवे रूग्ण

नवी दिल्ली : राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर आणि नागरिकता सुधारणा कायदा यामुळे प्रकाशझोतात आलेला शाहीन बाग परिसर आता कोरोना संसर्गाचा नवीन हॉटस्पॉट बनत चालला आहे. याचे कारण कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडू लागले आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीमध्ये ६२ नवे रुग्ण सापडले आहे.

दिल्लीमध्ये एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने कोरोना संसर्ग प्रभावित क्षेत्रामध्ये वाढ करून ६० प्रभागांना कोरोना संसर्ग हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. यामध्ये सीएए विरोधातील आंदोलकांचा केंद्रस्थान असलेला शाहीनबाग परिसरचा देखील समावेश करण्यात आला आहे.

दिल्ली सरकार कडून गुरुवारी काही नवीन भागांचा समावेश करण्यात आला. यात शाहीन बाग, अबुल फजर एन्क्लेव्हच्या आजूबाजूचा परिसर व शाहदरामध्ये राम नगरचा काही भाग आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीतील ६० भागांना सील करण्यात आले आहे. याशिवाय ऑपेरेशन शिल्डही या कोरोना संसर्गित प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रामध्ये राबविण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये आतापर्यंत १६४० रुग्ण सापडले आहे. यातील ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ६२ नवे रुग्ण सापडले आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत गेल्या दोन दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, पुन्हा आज वाढ झाली आहे.

दरम्यान, वसुंधरा एनक्लेवमध्ये मनसारा अपार्टमेंटमध्ये एक कोरोना संसर्गित सापडला होता. त्यामुळे या भागाला हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. सदरील व्यक्तीने सोसायटीच्या सर्व सार्वजनिक सुविधा वापरल्या आहे. यामुळे सोसायटीतील १८८ घरांना धोका जाणवू लागला असल्याने ही सोसायटी व आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे.