संविधानाची पूजा आणि ज्ञानाचा दिवा लावून आंबेडकर, फुले जयंती साजरी करा : शरद पवार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशासह राज्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबडेकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ’ एक दिवा ज्ञानाचा’ लावून साजरी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात जे घडले ते महाराष्ट्रात घडू नये यासाठी पवार यांनी हे आवाहन केले आहे.

लॉकडाउनमध्ये नागरिकांनी आणखी आठ दिवस सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. काळजी घेतली तर आपण निश्चितच कोरोनावर मात करु. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करत आहेत. सगळ्या जातीधर्मांनी एकत्र राहण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या काही दिवसात शब्बे ए बारात, महात्मा फुले जयंती आणि आंबेडकर जयंती आहे. परंतु यंदा जयंती उत्सवात गर्दी करु नका.

तसेच आज महावीर जयंती आहे. मला खात्री आहे की संबंधित नागरिक कोरोनाची परिस्थिती पाहून आपल्या कुटुंबासह घरातच भगवान महावीरांबद्दल आदर व्यक्त करत असतील. असाच कार्यक्रम 8 एप्रिलला होणार आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की यंदाच्या शब ए बारातला तुम्ही घरातच थांबा. हयात नसलेल्यांना घरातच स्मरण करा. त्यानंतर 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा संदेश दिला. त्यामुळे यंदा फुलेंची जयंती ही ’एक दिवा ज्ञानाचा’ लावून साजरी करा. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. यावर्षी आपण ’एक दिवस संविधानासाठी’ लावून जयंती साजरी करुया असे आवाहन पवार यांनी नागरिकांना केले.