‘सरकार पाडायचं नियोजन करता तसं लॉकडाऊनचंही करायला हवं होतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात लॉकडाऊन अचानक लादले. त्याबाबत कोणतेही नियोजन नव्हते, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितलं आहे. राहुल गांधी यांनी देखील तेच सांगितलं आणि आता राजीव बजाज यांनी मांडलेल्या मतांमुळे लॉकडाऊननंतरच्या अर्थव्यवस्थेचा भयंकर चेहरा समोर आला आहे. नोटबंदीप्रमाणाचे टाळेबंदीबाबत कोणतंही नियोजन नव्हतं. त्याचे दुष्परिणाम देश भोगत आहे. अशाप्रसंगी निर्णय एकांगाने घेऊन चालत नाही. सर्वांना विश्वासात घेऊन पावलं टाकावी लागतात, अशी टीका शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. गुजरातमध्ये राज्यसभा निवणूकीत धक्का द्यायचा म्हणून काँग्रेसचे आमदार विकत घ्यायचे किंवा फोडायचे, मध्य प्रदेशात ठरवून सरकार पाडायचं. यासाठी जसं नियोजन केलं जातं तसं काटेकोर नियोजन टाळेबंदीबाबतही करणं गरजेचं होतं, असा टोला नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीला सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे.

पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करीत केंद्र सरकारने अत्यंत क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे साथीचा फैलाव तर रोखला गेला नाहीच शिवाय अर्तव्यवस्थेचेही प्रचंड नुकसान झाले. या स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील काही प्रमाणात तग धरू शकतात. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे असे मजूर, गरीब वर्गातील लोक, शेतकरी यांच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे, अशी कडक टीका प्रसिद्ध उद्योगपती राजीव बजाज यांनी केली आहे. त्याच आधारे ‘बजाज यांचा बँण्ड’ अशा माथळ्याखाली लिहलेल्या आग्रलेखातून शिवसेनेनं लॉकडाऊनचा पंचनामाच केला आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दे
– बजाज यांनी लॉकडाऊनसंदर्भात केंद्र सरकारवर टीका केली. त्याबद्दल त्यांना ट्रोल केले जाईल, देशविरोधी ठरवले जाईल, पण स्वातंत्र्यपूर्व काळातील बजाज कुटुंबाचे योगदान व स्वातंत्र्यानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेस ताकद देण्याची त्यांची धडपड देशाला माहित आहे. त्यामुळे इतरांवर चालवले जाणारे हातखंडे बजाज यांच्याबाबतीत चालणार नाहीत.

– मोदी सरकारने देशात निर्घृण पद्धतीने लॉकडाऊन लागू केले, असं परखड मत राजीव बजाज यांनी मांडलं. त्यांनी काहीच नवं सांगितलं नाही. देशातील अनेक उद्योग, व्यापारी व नोकरदार वर्गास नेमके हेच सांगायचे होते. पण अनामिक भीतीने त्यांनी गप्प राहणे पसंत केले.

– बजाज यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत जे मुद्दे मांडले ते खोडून काढण्याची हिम्मत सरकारने दाखवायला हवी.

– टाळेबंदी केली नसती तर विषाणू जास्त पसरला असता. रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढला असता हे खरे, पण नोटाबंदीप्रमाणेच टाळेबंदीबाबत कोणतेही नियोजन नव्हते.

– राष्ट्राचा व समाजाचा विचार करणाऱ्या मोजक्या उद्योग घराण्यांचे बजाज हे प्रतिनिधी आहेत. सरकारचे उंबरठे झिजवून कंत्राटे मिळविणारे, बँकांची कर्जे बुडवून श्रीमंतीचा थाट मिरवणाऱ्यांपैकी ते नाहीत. त्यामुळे देशाच्या कठीण काळात बजाज काय म्हणाले, याला महत्त्व आहे.

– देशाने राहुल गांधी यांचेही आभार मानलेच पाहिजेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या टाळेबंदीत त्यांनी अनेकांना बोलते केले.