Lockdown : PM नरेंद्र मोदी यांची कोण दिशाभूल करत आहे काय ?, शिवसेनेचा ‘सवाल’

पोलिसनामा ऑनलाइन –  जेव्हा देशात एकही कोरोना रुग्ण नव्हता त्याच्या आधीपासूनच परदेशातून येणार्‍या लोकांची चाचणी सुरू केली आहे.21 दिवसांपूर्वी ‘लॉकडाऊन’ सुरू झाले तेव्हा संपूर्ण देशात 516 कोरोना रुग्ण होते. ते आता 12 हजारांवर गेले आहेत. बाहेरून येणार्‍या लोकांची चाचणी सुरू केली हे खरे असेल तर 56 देशांतून लोक दिल्लीतील ‘मरकज’ला पोहोचले कसे? हा प्रश्न आहेच. पंतप्रधानांची कोणी दिशाभूल करीत आहे काय?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

देशात कोरोनाच्या लढ्यासाठी केलेल्या उपाययोजनांची पंतप्रधानांनी काल माहिती दिली. मात्र यावरुन शिवसेनेने पंतप्रधानांची कोणी दिशाभूल करीत आहे काय? असा सवाल सामना संपादकीयमधून विचारला आहे. पंतप्रधानांनी सरकार काय करत आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यांना कमजोर करून व मुख्यमंत्र्यांची युद्धसामग्री कमी करून कोरोनाशी लढता येणार नाही. राज्यांनीच लढायचे आहे व पंतप्रधानांनी मार्गदर्शन करायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात व सांगतात तसेच मोदी बोलले. त्यांच्या चेहर्‍यावर  थोडी चिंता होती, पण त्यांनी देशाला विश्वास दिला. हा विश्वास पुढच्या युद्धासाठी महत्त्वाचा  आहे.

संकटे येतात आणि जातात. ‘महाभारत’ आणि ‘पानिपता’तून उभे राहिलेले हे राष्ट्र ‘कोरोना’विरुद्धच्या युद्धात त्याच जिद्दीने लढताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून जे भाषण केले त्यावर विरोधकांनी अकारण टीका करण्याचे कारण नाही. मोदी यांनी 3 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविले आहे. म्हणजे युद्धाचा कालावधी वाढवला आहे व 130 कोटी लोकांना 3 मेपर्यंत शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे घरातच बसून राहावे लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांची चिंता समजण्यासारखी आहे. पण मध्यप्रदेशसारखे राज्य कोरोनाविरुद्धच्या लढाईत खूपच मागे पडले आहे व तेथे संपूर्ण सरकार नोकरीवर रुजू होऊ शकलेले नाही. तेथील काँग्रेसचे सरकार पाडून भाजपाने आपला मुख्यमंत्री बसवला, पण मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ शकला नाही. त्यामुळे एकटे शिवराजसिंह चौहानच इकडेतिकडे धावत आहेत. हे राजकारण थोडे पुढे ढकलता आले असते. महाराष्ट्रात पंतप्रधान मदतनिधी की मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा घोळ घातला गेला आहे.