Corona Lockdown : सुरतमधील परप्रातींयांच्या गर्दीचा उल्लेखही नसल्यामुळे हे मोठे षडयंत्र, शिवसेनेची पुन्हा टीका

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपापल्या गावी जाण्यासाठी त्यांनी वांद्रे स्टेशन परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे शिवसेनेने शंका व्यक्त करत हे मोठे षडयंत्र असल्याचे नमूद केले आहे. सामनाच्या माध्यमातून सुरत येथे परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक झाला त्याचा साधा उल्लेखही होत नाही. हा काय प्रकार म्हणायचा? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

कोरोनामुळे देशात लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. तत्पुर्वी काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातमीमुळे मुंबईतून गावी जाण्यासाठी परराज्यातील मजूरांची गर्दी उसळली होती. मुंबईतून परराज्यांमध्ये जाणार्‍या गाड्या फक्त वांद्रयावरूनच सुटत नाहीत. त्या लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा रेल्वे स्थानकांवरूनही सुटतात. पुणे, नागपुरातूनही सुटतात; पण गर्दी जमा केली गेली ती फक्त वांद्रे स्थानकाजवळ. काही वृत्तवाहिन्यांवरही फक्त वांद्रे येथील मंगळवारच्या गर्दीवरच चर्चेची गुर्‍हाळे चालवली गेली.

या गुर्‍हाळांमध्ये सुरत येथे परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक झाला त्याचा साधा उल्लेखही होत नाही. हा काय प्रकार म्हणायचा? हे मोठे षड्यंत्र आहे. त्यामागचे गौडबंगाल लोकांना समजले. पण आम्ही या षड्यंत्राचा मुखवटा ओढून काढू. कोरोना संकटाची संधी साधून कोणी राजशकट खिळखिळे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या कपाळावर सरकारला खिळा ठोकावा लागेल. विरोधी पक्षाने इतक्या खाली घसरावे याचे आम्हाला दुःख होत आहे.सरकारला अडचणीत आणण्याची संधी विरोधक सोडत नाहीत. त्यासाठी ते कितीही खालच्या पातळीवर जायला तयार आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीस छेद देणारे हे प्रकार आहेत. अशा पद्धतीने विरोधी पक्ष वर्तन करीत असेल तर ते उरलेली पतही गमावून बसतील, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर उडालेल्या गोंधळामुळे काही पृश्न उपस्थित होत आहेत. 15 एप्रिलनंतरच्या तारखांसाठी रेल्वेने रिझर्व्हेशन कसे घेतले? पंतप्रधान ‘लॉक डाऊन’ उठवणार की आणखी काही करणार याबाबत संभ्रम असताना रेल्वे 40 लाख लोकांचे रिझर्व्हेशन घेऊन गोंधळ उडवते हा अपराध आहे. त्यामुळे वांद्रयात जी गर्दी उसळली, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यास रेल्वे मंत्रालय जबाबदार आहे व त्याबद्दल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत काय?, अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.