संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जे भोगावे लागते ना…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक केले असतानाही मनसे नेते राज ठाकरे विनामास्क वावरताना दिसतात. शुक्रवारी (दि. 5) नाशिक दौ-यावर असतानाही त्यांनी मास्क घातला नव्हता. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना देतात. सर सलामत तो पगडी पचास, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जे भोगावे लागते ना…तेंव्हा वाटत अरेरे ऐकायला हवे होते. मास्क घालायला हवा होता, मग आधीच ऐका ना, ते मनसेचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार? मास्क का वापरत नाहीत याचे ठोस कारण सांगावे, असे आवाहन खासदार राऊत यांनी ठाकरे यांना केले आहे. .

खासदार राऊत म्हणाले की, राज ठाकरेंनी मास्क का वापरू नये हे पटवून द्यावे. मास्क न वापरणे नागरिकांसाठी धोकादायक आहे, अजित पवारांनीही विधानसभेत तेच सांगितले. ते स्वत: या संकटातून गेले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आरोग्यावर चांगला अभ्यास आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही मापदंड घालून दिले आहेत. त्याचे पालन केले पाहिजे. मास्क ही खरी लस आहे. कोरोनाविरुद्ध ही लढाई लढताना आमच्याकडूनही कधी ढिलाई होते. परंतु तसे चालत नाही. मी अनेकदा नियमांचे पालन करतो. परंतु मास्क खाली येताच मला मुख्यमंत्र्यांची आठवण येते. कारण त्यांनी असे पाहिल तर ते ताबडतोब चंपी करतात, प्रेमाने असो वा काळजीपोटी. मास्क घालण्याचा त्यांचा आग्रह कायम असतो, असेही राऊत म्हणाले. तसेच काही दिवसांपूर्वी दिल्लीत मला स्वत:ला मास्क न वापरण्याचा दंड भरावा लागल्याचेही त्यांनी सांगितले.