Coronavirus : काय सांगता ! होय, हातावर शिक्के मारून ‘होम क्वारंटाइन’ केलेल्या 16 जणांनी केला एकाच कारमधून प्रवास

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के असतानाही 16 लोक एकाच कारमधून प्रवास करणार्‍यांना वडगाव मावळ पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी नाकाबंदी करुन या सर्व व्यक्तींना पुढील प्रवास करण्यापासून रोखले.

हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के असलेले 16 व्यक्ती आणि काही लहान मुले मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. त्यांना वडगाव पोलिसांनी पकडलं असून पुन्हा होम क्वारंटाईनसाठी पाठवण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यात 4 महिला, 3 पुरुष आणि 9 लहान मुले होती.

सर्वजण मुंबईमधील राहणारे आहेत. नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने मुंबईमधून हे 16 जण उस्मानाबाद येथील उमरगा येथे गेले होते. तेथील सर्व विधी करून ते परतणार तेवढ्यात गावातील नागरिकांनी हे मुंबई वरून आले असल्याने आरोग्य विभागाला याची माहिती दिली. त्यांना उस्मानाबाद येथील उमरगा येथेच हातावर शिक्के मारून होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, 31 तारखेला सर्वजण गुपचूप रात्री एका मोटारीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जागोजागो नाकाबंदी असल्याने त्यांनी रात्री उशिरा प्रवास सुरु केला. मात्र, वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी सुरू होती. तेव्हा हे सर्वजण एका वाहनातून एकत्र प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्यांच्या हातावर शिक्के असल्याचे दिसले त्यानंतर त्यांना तातडीने होम क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले.