Coronavirus : ‘कोरोना’ आपोआप नष्ट होणार ? शास्त्रज्ञांना दिसून आला व्हायरसमध्ये ‘हा’ विशेष बदल

वॉशिंग्टन :  वृत्तसंस्था –   जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत लाखो जणांना आपल्या विळख्यात घेतले आहे. तर अनेकांचे यामुळे जीव गेले आहेत. कोरोनाबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नाश कधी होणार याची प्रतिक्षा प्रत्येकाला आहे. कदाचित लवकरच कोरोना व्हायरसचा नाश होण्याची शक्यता आहे. कारण कोरोना व्हायरसमध्ये शास्त्रज्ञांना असे बदल दिसून आले, ज्यामुळे तो कमजोर पडत आहे.

एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसमध्ये अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरसमध्ये बदल पहायला मिळाला आहे, यातून माणसामध्ये व्हायरसचं संक्रमण कमजोर पडत असल्याचे संकेत मिळत आहेत. यूएसमधील एरिजोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी काही कोरोना रुग्णांच्या शरीरातील व्हायरसचे सॅम्पल घेतले. त्यावेळी त्यांना असे दिसून आले की एरिजोनातील एका कोरोना रुग्णाच्या शरीरातील व्हायरसमध्ये बदल झाला आहे. व्हायरसच्या जेनेटिक मटेरियलचा एक भाग गायब असल्याचं त्यांना आढळलं.

सार्सचा उद्रेक 2003 मध्ये झाला होता तेव्हा या व्हायरसमध्ये असाच बदल दिसून आला होता. त्या व्हायरसचंही जेनेटिक मटेरियल गायब झालं होतं आणि त्यानंतर सार्सची प्रकरणं कमी झाली. त्यानंतर सार्सचा हळूहळू नाश होऊ लागला होता. एरिजोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते, इतर ठिकाणच्या सॅम्पलमध्येही असे बदल दिसून येणं गरजेचं आहे. जर मोठ्या प्रमाणात व्हायरसचं जिनोम सिक्वेसिंग केलं जाईल तर असे परिणाम इतर ठिकाणीही मिळू शकतात.