’कोरोना’बाबत कुठलाही मेसेज फॉरवर्ड करताना सावधान ! ‘व्हायरस’बाबत चुकीची माहिती पडेल ‘महागात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने आता भारताची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या 26 पेक्षा जास्त झाली आहे. यामुळे राज्य सरकारसुद्धा अलर्ट झाले असून स्थानिक प्रशासन कडक नियमांची अंमलबजावणी करताना दिसत आहे. कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर अनेक अफवादेखील पसरवल्या जात आहेत, या अफवा रोखण्यासाठी प्रशासनाने अतिशय कडक पावले उचलली आहेत. आता कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणे महागात पडणार आहे.

सोशल मीडियावर कुणीही कोरोना व्हायरसबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, अशा अफवा सध्या मोठ्याप्रमाणात पसरवल्या जात आहेत. याची दखल राज्य सरकारसह मुंबई महापालिकेनेही घेतली आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना एक पत्र दिले असून अफवा पसरवणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र काही व्यक्ती चुकीची माहिती, चुकीची सूचना, चुकीची परिपत्रके व्हॉट्स अप, फेसबुक, टि्वटर इत्यादी माध्यमातून नागरिकांमध्ये पसरवत आहेत, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 54 अंतर्गत सामाजिक प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने कोरना व्हायरसबाबत चुकीची माहिती पसरवणार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना द्यावेत, अशी विनंती पालिका आयुक्तांनी केली आहे.

देशात कोरोनाची आपत्ती
केंद्र सरकारने कोरोना व्हायरसला आपत्ती घोषित केले आहे. यामुळे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मदत मिळणार आहे. राज्याच्या डिझास्टर रिस्पॉन्स फंडमार्फत मदत म्हणून निधी दिला जाईल. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचा कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपये मिळतील. यामध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आणि या रुग्णांची देखभाल करणार्‍या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाचा समावेश आहे. परंतु, चार लाखाच्या मदतीचा हा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतल्याचे वृत्तदेखील आहे.

कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी देशात साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला आहे. 123 वर्ष जुना असलेला हा कायदा एखाद्या आजाराला आळा घालण्याचे प्रयत्न अयशस्वी होत असल्यास लागू केला जातो. यातून राज्यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार मिळतात. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 84 आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक 26 रुग्ण आहेत.  त्यामुळे राज्यातल्या सर्व शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील कोरोनाचे रूग्ण
पुणे – 10
मुंबई – 5
नागपुर – 4
यवमाळ – 2
ठाणे – 1
कल्याण – 1
पनवेल – 1
नवी मुंबई – 1
अहमदनगर – 1

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like