Coronavirus : ‘लेकरा, तुझ्यात बाळासाहेबांचं ‘रक्त’, राज्याची जबाबदारी छान निभावतोय’ (ऑडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचे संकट उभं राहिल आहे. जगातील 200 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेक देशांना आर्थिक फटका बसला आहे. 15 लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 89 हजारापेक्षा अधिक जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. राज्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात पुणे आणि मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1100च्या वर पोहचली आहे तर मृतांचा आकडा 70 झाला आहे. राज्यात कोरोनाशी लढताना संयमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियातही अनेकदा उद्धव ठाकरे, राजेश टोपे यांच्याबद्दल कौतुकास्पद प्रतिक्रिया उमटत आहेत. एवढ्या संघर्षाच्या काळातही कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकेर यांनी राज्याची धुरा योग्य प्रकारे सांभाळली आहे. याचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील केले आहे.

अशा परिस्थिती अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिले आहेत. त्या म्हणाल्या, इतकं आव्हान, संकट तुझ्यावर आहे, दडपण असतानाही तु सगळं हे निभावतोय, बाळा, तुझ्या खांद्यावर अवघ्या देशाची जबाबदारी आहे, अभिमान वाटतो तुझा अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: सिंधुताई सपकाळ यांना फोन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, तुम्ही उभ्या आयुष्यात हा संघर्ष पाहीला आहे. तुमच्या आशीर्वादाने मी पुढे चाललोय. मुख्यमंत्रीपद हे वेगळं नाही. मी आहे तसाच आहे. राज्याची जबाबदारी मी सांभाळतोय. तुम्हीही तुमची काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, असे त्यांनी सिंधुताईंना सांगतले.