Coronavirus : ‘कोरोना’बद्दल सोनिया गांधींनी PM मोदींना दिले ‘हे’ 5 प्रस्ताव, म्हणाल्या – ‘जाहिराती स्थगित करून पैसे वाचवा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि या साथीच्या आजारावर उपाय म्हणून सरकार कठोर निर्णय घेत आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांशी फोनवर चर्चा केली आणि कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सूचना मागितल्या. आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून काही सूचना दिल्या आहेत, तातडीने या सूचनांवर अंमलबजावणी करण्याची विनंती त्यांनी केली आहे. खासदारांच्या पगारातून 30 टक्के कपात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे सोनिया गांधींनी समर्थन केले. याशिवाय पंतप्रधानांसमोर 5 सूचनादेखील ठेवल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे…

1) सरकारने टेलीव्हिजन, प्रिंट आणि ऑनलाईन माध्यमांना दिलेल्या सर्व जाहिराती थांबवल्या पाहिजेत. त्या दोन वर्षांसाठी बंद केल्या पाहिजेत, जेणेकरून वर्षाकाठी 1250 कोटी रुपयांची बचत कोरोनाशी लढण्यासाठी वापरली जावी.

2) शासकीय इमारतींमध्ये बांधकामांच्या कामासाठी सरकारने दिलेली 20 हजार कोटी रुपयांची रक्कम थांबवण्यात यावी. माझा असा विश्वास आहे की सध्याच्या संसदेच्या इमारतीतून काम केले जाऊ शकते, या रकमेतून रुग्णालय सुधारणा, पीपीई सारख्या सुविधांची व्यवस्था केली जाऊ शकते.

3) खासदारांचे निवृत्तीवेतन, वेतनात जी 30 टक्के कपात केली गेली आहे ती मजूर, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना आर्थिक मदत देऊन वापरली जाऊ शकते.

4) राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यमंत्री यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचा परदेशी प्रवास थांबविला पाहिजे. अशा दौऱ्यातून वाचवलेले पैसे कोरोनाविरूद्धच्या लढ्यात वापरता येतील. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी थांबवून 393 कोटी वाचू शकतात असे पत्रात लिहिले आहे.

5) पंतप्रधान केअर्स मध्ये जेवढी रक्कम मदतीच्या स्वरूपात आली आहे त्या रकमेस पंतप्रधान मदत निधीमध्ये हस्तांतरित केले जावे. यामुळे पारदर्शकता येईल, पंतप्रधान मदत निधीमध्ये सध्या 3800 कोटींची रक्कम पडून आहे. अशात दोन्ही निधींची रक्कम एकत्र वापरली जाऊ शकते.

महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने सोमवारी मंत्रिमंडळात राष्ट्रपती, राज्यपाल यांच्यासह सर्व खासदारांच्या पगारामध्ये किंवा निवृत्तीवेतनात 30 टक्के कपात करण्याची घोषणा केली. ही रक्कम कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धामध्ये वापरली जाईल, त्याशिवाय एमपीएलएडी (MPLAD) ची रक्कम देखील यात वापरली जाईल. ज्यास अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला होता.