Coronavirus : चीनच्या बाहेर तब्बल 17 पट वेगानं फोफावतोय ‘कोरोना’ व्हायरस

बीजिंग : वृत्तसंस्था – चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस ने जगभर भीतीचे वातावरण पसरत आहे. जगभरात जवळपास ८० देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. १७ पट वेगाने हा व्हायरस जगभर पसरतो आहे अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. भारतात विविध राज्यात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. कोरोना व्हायरस बाबत सुरक्षा आणि स्वछतेची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

जगभरात ३३८३ जणांचा मृत्यू

आजपर्यंत जगात सुमारे ९८ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ३३८३ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. चीनमध्येच जवळपास तीन हजार जणांचा मृत्यू झाला असून ८० हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण घटले आहे. मात्र, जगातील इतर देशांमध्ये करोनाचा संसर्ग अधिक वेगाने होत आहे.

चीननंतर इटली आणि इराणमध्ये सर्वाधिक मृत्यू

कोरोनाच्या संसर्गामुळे चीननंतर इटली आणि इराणमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. इटलीमध्ये ३८५८ जणांना बाधा झाली आहे. तर, १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये ३५१३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. इराण सरकार कोरोनाबाबत पारदर्शीपणे माहिती देत असून इतर देश माहिती लपवत असल्याचा आरोप इराणने केला आहे.

दक्षिण कोरियातही कोरोनाचा संसर्ग

दक्षिण कोरियातही कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचे वृत्त आहे. दक्षिण कोरियात सहा हजारहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याशिवाय, ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही कोरोनाचा फैलाव झाला आहे. अमेरिकेत सुमारे १५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे.