Coronavirus : कोरोनाचा 70 देशात ‘हाहाकार’, 3100 जणांचा ‘मृत्यू’ तर 91 हजारांहून अधिक जणांना ‘संसर्ग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत आहे. जगातील ७० हून अधिक देशांमध्ये हा संसर्ग पसरला असून यामध्ये भारताचाही समावेश आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगात ३१०० हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे तर ९१ हजारहून अधिक जणांना संसर्ग झाल्याचे समजते.

चीनमध्ये २९८१ जणांचा बळी :
या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका चीनला बसला आहे. आतापर्यंत चीनमध्ये २९८१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८० हजारहून अधिकजणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगातील एकूण मृत्यूपैकी ९५ टक्के मृत्यू हे चीनमध्येच झाले आहेत. त्यात हुबेई प्रांत कोरोनाचे केंद्र बनले आहे.

इराणमध्ये  ७७ जणांचा मृत्यू २३ खासदारांना संसर्ग:
चीननंतर कोरोनामुळे मोठ्या पप्रमाणात बाधित देशांपैकी एक असणाऱ्या इराणमध्ये आतापर्यंत ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २३३० जणांना बाधा झाली आहे. ज्यात २३ खासदारांचाही समावेश आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये इराणचे काही महत्त्वाचे नेते आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

इटलीत करोनाचे ८९ बळी :
इटलीमध्येही गंभीर परिस्थिती उद्भवली असून करोनामुळे इटलीत ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. सोबतच संक्रमित रुग्णांची संख्या २५०२ वर पोहोचली आहे.

अमेरिकेत ९ जणांचा मृत्यू, १०० जणांना संसर्ग :
बलाढ्य अश्या अमेरिकेतही कोरोना फैलावत आहे. अमेरिकेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून संसर्गाचा आकडा १०० वर पोहोचला आहे. यावर खबरदारी म्हणून अमेरिकेत शाळा, सब-वे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय लसीकरण मोहीमही सुरू करण्यात आली आहे.

दक्षिण कोरियात रुग्णांच्या संख्येत वाढ :
दक्षिण कोरियातही करोना व्हायरस पसरताना दिसत आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून ५३२८ जणांना कोरोनाने बाधित आहेत. दरम्यान, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी कोरियात एकाच दिवशी ८५१ करोनाचे रुग्ण आढळले.

फ्रान्समध्ये चौघांचा मृत्यू :
तसेच फ्रान्समध्ये देखील कोरोनामुळे चारजणांचा मृत्यू झाला असून २१२ जण संक्रमित असल्याचे आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये होणारे पॅरिस बुक फेअरही रद्द करण्यात आला आहे. त्याशिवाय इतरही सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले आहेत.