Coronavirus : कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, वाकड पोलीस लाईनमधील एक इमारत ‘सील’

वाकड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. राज्यातील पुणे आणि मुंबई मध्ये कोरोनाबाधिक रुग्णांची संख्या जास्त असून या दोन शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना योद्धा असलेल्या आरोग्य आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये दोन पोलीस कर्मचारी कोरोना संशयीत आढळून आले होते. त्यांचे रिपोर्ट आले असून ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे वाकड पोलीस लाईनमधील एक बिल्डिंग सील करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

नागरिकांचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱी दिवसरात्र धडपडत आहेत. असे असतानाही काही दिवसांपूर्वी दोन पोलीसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. दोन पोलिसांपैकी एकाला पुण्यात कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा संसर्ग झाला. हा पोलीस कर्मचारी वाकड पोलीस लाईनमध्ये वास्तव्यास असून तो राहात असलेली बिल्डींग सील करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडे दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी सोशल डिस्टिन्सिंग पाळावे. तसेच विनाकारण घराबाहेर पडून नये. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क घालावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.