भाजपाचा महाविकास आघाडीवर निशाणा; म्हणाले – ‘राज्याला ना धोरण ना दिशा ही आजची अवस्था’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना विषाणूचा संक्रमण अधिक विस्तारत असतानाच इकडे राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. लॉकडाऊन, लसीकरण आणि औषध पुरवठ्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक परस्परावर आरोप-प्रत्यारोप करत आहे. यावरून काँगेस नेते आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लागू करण्याची मागणी पत्राद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. या पत्रावरून आता भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

यावरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणिबाणी लागू करा, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस आमदार आशिष देशमुख यांनी पंतप्रधान मोदीना लिहिले आहे. राज्यातले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचे आता कॉग्रेससुद्धा बोलू लागली आहे. राज्याला ना धोरण ना दिशा ही आजची अवस्था आहे. हे आता सत्ताधारीही कबूल करू लागले आहेत. अशी जोरदार टीका केली.

काय म्हणाले होते आशिष देशमुख?

राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणिबाणी लागू करा, महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यामध्ये घटनेतील कलम ३६० अन्वये किमान २ महिन्यांसाठी आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केलीय.