WHO सह 80 शास्त्रज्ञांची धोक्याची सूचना ! ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी ‘हा’ उपाय ठरतोय जीवघेणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगातील 200 पेक्षा जास्त देशात कोरोना महामारीनं हाहाकार माजवला आहे. सर्व देश याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनापासून बचावासाठी हर्ड इम्युनिटी तयार व्हायला हवी असं मत अनेक वैज्ञानिकांनी व्यक्त केलं होतं. हर्ड इम्युनिटी म्हणजे लोकसंख्येचा मोठा भाग हा कोरोनानं संक्रमित व्हायला हवा. जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत धोक्याची सूचना दिली होती. जगभरातील 80 वैज्ञानिकांनी, तज्ज्ञांनी हर्ड इम्युनिटी अवलंब जीवघेणा ठरू शकत असल्याचं सांगितलं आहे.

आरोग्य संशोधन नियतकालिक लॅसेंटमध्ये प्रकाशित झालेल्या एका माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर 80 वैज्ञानिक आणि संशोधकांनी हर्ड इम्युनिटीबाबत एक जाहीर पत्र लिहलं आहे. या पत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी हर्ड इम्युनिटीचा अवलंब करणं कितपत सुरक्षित आहे याबाबत पुरावे नाहीत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाला रोखण्यासाठी निर्णायक आणि तात्काळ उपायांचा अवलंब करायला हवा.

हर्ड इम्युनिटीपेक्षा लसीकरण सुरक्षित

लॅसेंटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन केल्यामुळं आणि इतर समारंभ रोखल्यामुळं कोरोनाचा वेग अनेक ठिकाणी कमी झाला आहे. तर काही देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आलेली दिसत आहे. वैज्ञानिकांच्या मते कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हर्ड इम्युनिटीच्या उपायाचा अवलंब करणं फायद्याचं ठरणार नाही. याचा धोका पत्करण्यापेक्षा लसीची वाट पहाणं योग्य ठरेल.

हर्ड इम्युनिटीबाबत WHO नं दिली धोक्याची सूचना

WHO चे प्रमुख ट्रेडोस अडनहॅम घेब्रियेसुस यांनी समिती बैठकी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार हर्ड इम्युनिटी अशी संकल्पाना आहे. ज्याचा वापर लसीकरणासाठी केला जातो. या प्रकारात लसीकरण एका मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर कोणत्याही व्हायरसपासून लोकसंख्येचा बचाव करता येऊ शकतो.