‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी आमच्याकडून अधिक कर घ्या, अतिश्रीमंत व्यक्तींचा पुढाकार

पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेबरोबरच जगभरातील 80 हून अधिक कोट्याधीशांनी एक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. श्रीमंत व्यक्तींनी जगभरातील सरकारांनी सुपर रीच म्हणजेच अतिश्रीमंतांकडून जास्त प्रमाणात कर घ्यावा अशी मागणी केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी यामुळे मदत होईल असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. या 80 कोट्याधीशांच्या गटाचे नाव ‘मिलेनियर्स ऑफ ह्युमॅनिटी’ म्हणजेच ‘मानवतेसाठी करोडपतींची साथ’ असे आहे.

श्रीमंत लोकांकडून तातडीने अधिक कर आकारण्यास सुरुवात करण्यात यावी. ही कर वसुली तातडीने, उघडपणे आणि कायमस्वरुपी असावी असे या पत्रामध्ये म्हटले आहे. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरामध्ये बेरोजगारी वाढली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आता या श्रीमंत व्यक्तींनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. श्रीमंतांकडून अधिक कर घ्यावा अशी मागणी करणारे पत्र सरकारला पाठवण्यात आले आहे. या पत्रावर सह्या करणार्‍यांमध्ये बेन अ‍ॅण्ड जेरीज आइस्क्रीम कंपनीचे सह संस्थापक जेरी ग्रीनफील्ड, स्क्रीन रायटर रिचर्च कर्टिस आणि चित्रपट निर्माते एबिलेग डिझनी यांचा समावेश आहे. याचबरोबरच अमेरिकेतील उद्योजक सिडनी टोपोल आणि न्यूझीलंडचे व्यवसायिक स्ट्रीफन टिंडल यांचाही समावेश आहे.