coronavirus : सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला सुनावलं, म्हणाले – ‘तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही’

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटत असली तरी मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशातील विविध उच्च न्यायालयांत कोरोनासंदर्भात याचिका दाखल केल्या आहेत. स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर दाखल केेलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेवरून केंद्र तसेच राज्यांचे सुरू असलेले प्रयत्न पुरेसे नाहीत. तुमच्या या कामगिरीवर आम्ही समाधानी नाही या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 4 लाखांचे अनुदान देण्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस बजावत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

मजूर, कामगारांची नोंदणी प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच ही प्रक्रिया गतिमान करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जेणेकरून स्थलांतरीत मजूर, कामगारांना सरकारी योजनांचा योग्य पद्धतीने आणि प्रमाणात लाभ मिळवता येऊ शकेल. मात्र, नोंदणी झाल्याशिवाय योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. स्थलांतरीत मजूर, कामगारांना सरकारी योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळेल, याबाबत केंद्र सरकारने निश्चित धोरण राबवले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याच कालावधी देशात 3 लाख 2 हजार 544 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 4 हजार 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या आढळलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.