Corona Virus : हिरे उद्योगाला ‘कोरोना’चा ‘फटका’, 8 हजार कोटींचे नुकसान होण्याची दाट शक्यता

सुरत : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरसचा फटका आता व्यापारी वर्गावर देखील होत आहे. सुरत मध्ये कोरोना व्हायरसमुळे हिरे उद्योगाला तब्बल 8 हजार कोटींचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

हॉंगकॉंग हे सुरत मधील हिरे उद्योगासाठीचे एक मोठे केंद्र आहे. कोरोना व्हायरसचा हॉंगकॉंग मध्ये प्रसार होत असल्याने आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सुरतच्या हिरे उद्योगास तब्बल 8 हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनूसार पुढील दोन महिने सुरत मधून होणारी हिऱ्यांची निर्यात बंद राहू शकते. हॉगकॉग ने मार्चपर्यंत आयात व इतर व्यवहार बंद केले आहेत.

जेम्स ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन चे अध्यक्ष दिनेश नवाडीया यांनी सांगितले की, दरवर्षी सुरतवरून 50 हजार कोटी रुपयांचे पॉलिश्ड हीरे हाँगकाँगला एक्सपोर्ट होतात. हे सुरतच्या एकूण हिरे एक्स्पोर्ट च्या ३७ % आहे. हॉंगकॉंग मध्ये मार्चपर्यंत सुट्ट्या घोषित केल्या आहेत. हॉगकाँग मधून गुजरातच्या व्यापाऱ्यांना परत पाठवले आहे. जर ही परिस्थिती सुधारली नाही तर याचा व्यापारावर मोठा परिणाम पडेल. देशात आयात होणाऱ्या हिऱ्यांपैकी ९९ % हिरे हे सूरतमध्येच पॉलिश होतात, असेही दिनेश नवादिया यांनी सांगितले.

हाँगकाँगमध्ये पुढच्या महिन्यात इंटरनॅशनल ज्वेलरी एग्जिबिशन आहे. मात्र, कोरोना विषाणूमुळे हा कार्यक्रम रद्द होऊ शकतो. जर असे झाले तर सूरतच्या ज्वेलरी व्यापाराचे मोठे नुकसान होईल, कारण या इंटरनॅशनल एग्जिबिशनमध्ये हिऱ्यासोबतच ज्वेलरीदेखील विकली जाते, असे हीरे व्यपारी प्रवीण नानावती यांनी सांगितले.

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या 490 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 24324 जणांना याची लागण झाली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत आणखी 65 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तसेच या विषाणूचा संसर्ग झालेले 3887 नवे रुग्ण आढळून आले. हुबेई प्रांतातील 431 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 3219 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, तर संपूर्ण देशात उपचारानंतर 892 लोक बरे झाले आहेत. या रुग्णांच्या सतत संपर्कात असलेल्या सुमारे अडीच लाख लोकांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. हाँगकाँगमध्ये 18 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मकाऊमध्ये 10 तर तैवानमध्ये 11 रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी चीनमध्ये हजार खाटांचे रुग्णालय सोमवारी सुरू करण्यात आले होते, तर 1300 खाटांचे रुग्णालय बुधवारपासून सुरू झाले.