‘तबलीगी जमात’चा स्वयंघोषित अध्यक्ष मौलाना सादचा मोठा ‘खुलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तबलीगी जमातचा स्वयंघोषीत अध्यक्ष मौलाना साद याच्या मागावर दिल्ली पोलीस आहेत. त्याच्या शोधासाठी अनेक ठिकाणी छापे घातले आहेत. परंतु, दिल्ली पोलिसांना माझा ठावठिकाणा ठावूक आहे असं खुद्द मौलाना साद याने एका चॅनलशी बोलताना म्हटलं आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी मला कोरोना टेस्ट करण्यास सांगितले होते, ती देखील मी केली असल्याचा खुलासा साद याने केला आहे.

सादने केली कोरोना टेस्ट
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागानं मला दोन वेळा नोटीस पाठवली. मी त्याला उत्तर दिली. माझा मुलगा घरात उपस्थित असताना गुन्हे शाखेने घराची झडती घेतली. पोलिसांनी मला कोरोना टेस्ट करायला सांगितले. तीही मी केली. परंतु अद्याप रिपोर्ट आलेला नाही. टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला देण्यात येईल, असे साद याने मुलाखतीत म्हटले आहे.

मरकजमध्ये का केली गर्दी ?
आम्ही लॉकडाऊन दरम्यान मरकझमध्ये कुणालाही आमंत्रित केले नाही. आमचे सगळे कार्यक्रम 23 मार्च रोजी म्हणजेच लॉकडाऊनपूर्वीच रद्द करण्यात आले होते. परंतु अनेक तबलीगी जमातचे कार्यकर्ते अगोदरच मरकजमध्ये उपस्थित होते. अचानक लॉकडाऊन लागू झाल्याने ते आपल्या घरी जाऊ शकले नाहीत, असा खुलासा सादनं केला आहे.

आम्ही परवानगी मागितली पण..
22 मार्च रोजी जनता कर्फ्यू दरम्यान थोडी सूट मिळाली तेव्हा आम्ही अनेक कार्यकर्त्यांना तिथून हलवलं. परंतु, दिल्लीत 23 मार्च रोजी कर्फ्यू लागल्याने ते अडकले. आम्ही मरकझमध्ये अडकल्याने लोकांना त्यांच्या ठिकाणापर्यंत हलवण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु प्रशासनाकडून ही परवानगी मिळाली नाही, असेही सादनं सांगितलं.