‘तबलिगी’ जमात पासून डॉक्टरांचं संरक्षण करण्यासाठी दिल्ली दाखल झाली लष्कराची ‘टीम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच ‘तबलिगी जमात’च्या मेळाव्याला दिल्लीतील निजामुद्दीन येथे अनेकांनी हजेरी लावली आणि यातील बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह असून ते देशभर पसरले आहेत. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ माजली आहे. अशा लोकांना देशभर शोधून काढण्याचे आणि त्यांच्यावर उपचार करण्याचे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरु आहे. पण दुर्दैवाची बाब अशी की हे तबलीघी जमातचे अनेक जण डॉक्टरांशी, नर्सेसशी आणि इतर मेडिकल स्टाफसोबत गैरकृत्य करत असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे दिल्लीच्या नरेला आयसोलेशन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराची एक मेडिकल टीम दाखल झालीय. सहकार्य न करणाऱ्या आणि स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्या समाज कंटकांना वठणीवर आणण्यासाठी लष्करानं आपल्या मेडिकल टीमसोबत हत्यारांसहीत प्रोटेक्शन टीमही पाठवली आहे.

डॉक्टरांसहित लष्कराच्या तुकडीचीही पाठवणी

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराजवळ नरेला आयसोलेशन कॅम्पकडून वैद्यकीय सेवेसाठी मदतीची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय लष्करानं आपल्या दोन डॉक्टरांसहीत दोन सपोर्टिंग स्टाफची एक टीम नरेला आयसोलेशन कॅम्पमध्ये पाठवली आहे. या टीमसोबत लष्कराची एक छोटी प्रोटेक्शन टीमदेखील आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) १०० तुकड्या तैनात

दरम्यान, दिल्लीत कोविड १९ धोक्याच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरक्षा व्यवस्था आणखीन कडक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) १०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांमध्ये जवळपास १०,००० जवान तैनात आहेत.

‘त्या’ ९००० जणांची ओळख पटली

दिल्लीतील निझामुद्दीन येथे मरकझला गेलेल्या ९ हजार लोकांची ओळख पटली आहे. या ९००० पैंकी १३०६ लोक परदेशी नागरिक आणि उरलेले इतर भारतीय आहेत. यातील जवळपास ४०० जण करोना संक्रमित असल्याचं समोर आलंय. तबलिगी जमातशी निगडीत १८०४ जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय, अशीही माहिती केंद्रीय मंत्रालयानं दिलीय.