Coronavirus Test : ‘कोरोना’चा नमुना स्वतः घेतल्यास येतील ‘अचूक’ परिणाम, शिवाय होतील ‘हे’ 4 फायदे, वैज्ञानिकांनी केला दावा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी असा दावा केला की कोविड-19 चाचणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी स्वतः नाकातून घेतलेला नमुना अधिक अचूक आणि सुरक्षित आहे. संशोधकांना असे आढळले आहे की नाकातून घेतलेल्या नमुन्याचा अभ्यास करणे सध्या नाकाच्या वरच्या भागातून घेतल्या जाणाऱ्या नमुन्यापेक्षा अधिक सोपे आहे. शास्त्रज्ञांनी स्वत: नमुना घेण्याचे फायदे देखील सांगितले आहेत.

स्वत: नमुना घेण्याचे फायदे :-

– नमुने गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात किट वाटप करता येऊ शकतात, ज्यामुळे अधिकाधिक लोकांची तपासणी करणे शक्य होईल. संशोधकांनी सांगितले की जे लोक किट वापरतील, त्यांना प्रयोगशाळेत जाण्याची गरज भासणार नाही.

– चाचणी किटचे वितरण करून लोक त्यांचे नमुने घेण्यास सक्षम होतील. यामुळे मोठ्या संख्येने लोकांची चाचणी होऊ शकेल.

– यामुळे प्रवासादरम्यान इतर लोक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. तसेच स्वतः नमुना गोळा केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे वापरण्यात येणाऱ्या वैयक्तिक संरक्षक उपकरणांची (पीपीई) बचत होईल.

– रुग्ण स्वत:च्या कार आणि घरात नमुना संकलन प्रक्रिया पूर्ण करू शकतो. यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांना लागण होण्याचा धोका कमी होईल आणि अधिकाधिक लोक तपासणीसाठी नमुना सादर करण्यास सक्षम असतील.

दरम्यान स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर माल्डोनाडो म्हणाले, ‘विषाणूचा प्रसार होण्याचा वेग कमी करण्यासाठी आपल्याला त्वरित तपास क्षमता वाढवण्याची गरज आहे.’

नमुना घेण्यापूर्वी रुग्णांनी पाहिला व्हिडिओ

अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनाचे निकाल 30 सहभागींवर आधारित आहेत. यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झालेल्या या लोकांनी नमुना कसा घ्यावा हे सांगणारा एक लहान व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि एक पृष्ठ मार्गदर्शक तत्त्वे वाचल्यानंतर तपासणीसाठी स्वतःचे नमुने गोळा केले.

पहिल्यांदा लक्षणे दिसू लागल्यावर किती दिवसांनी चाचणी अहवाल सकारात्मक येतो

पहिल्या लक्षणांनंतर किती दिवसांनंतर त्या व्यक्तीचा चाचणी अहवाल सकारात्मक येतो हे संशोधकांना जाणून घ्यायचे होते. या संशोधनात सहभागी असलेल्या सहभागींनी असे सांगितले की ते प्रयोगात्मक तपासणीसाठी येण्यापूर्वी 4 ते 37 दिवसांआधी त्यांच्यात लक्षणे दिसली होती.

माल्डोनाडो म्हणाले, संक्रमित व्यक्ती किती काळ संक्रमित आहे आणि त्यांच्या घरात संक्रमणाची परिस्थिती काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच ते म्हणाले, ‘ही माहिती आरोग्य कर्मचार्‍यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात उपयुक्त ठरेल. उदाहरणार्थ, कोविड -19 रुग्णाला किती काळ अलिप्त ठेवले पाहिजे आणि कुटूंब व सहकाऱ्यांना संक्रमित लोकांसह पुन्हा एकत्र येणे कधी सुरक्षित होईल.