…तर भारतातील ‘कोरोना’ रुग्णांची संख्या 19 लाखांपेक्षा जास्त असेल, ट्रम्प यांचा ‘दावा’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   भारत आणि चीननं अधिक कोरोना चाचण्या केल्यास त्या देशांमधील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त असेल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेत आतापर्यंत दोन कोटी चाचण्या केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी इतर देशातील कोरोना चाचण्यांची आकडेवारी दिली. जर्मनीमध्ये 40 लाख तर सर्वाधिक चाचण्या दक्षिण कोरियात करण्यात आल्या असून या ठिकाणी तीस लाख रुग्ण असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिनस् कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या 19 लाखांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 9 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्य़ंत 2 लाख 36 हजार 184 जणांना, तर चीनमध्ये 84 हजार 177 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारताने आतापर्यंत 40 लाख जणांच्या कोरोनाच्या चाचण्या केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

अमेरिकेनं आतापर्यंत 2 कोटी पेक्षा जास्त कोरोना चाचण्या घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तुम्ही जेवढ्या जास्त चाचण्या घेता, तितके जास्त रुग्ण आढळून येतात, असे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. जितक्या जास्त चाचणी होतील, तितके जास्त रुग्ण सापडतील, आपण जास्त चाचण्या घेत असल्यानं रुग्णांची संख्याही जास्त आहे, असे सांगताना ट्रम्प म्हणाले, भारत आणि चीन देखील चाचण्यांची संख्या वाढवल्यास त्याठिकाणी अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील.

जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 68 लाखांपेक्षा अधिक आहे. यामध्ये अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण आहेत. अमेरिकेतील रुग्णांची संख्या 19 लाखापेक्षा जास्त आहे. तर कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील अमेरिकेत सर्वाधिक आहे. जगभरात कोरोना विषाणूमुळे जवळपास चार लाख जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 1 लाखाहून अधिक रुग्ण हे एकट्या अमेरिकेतील आहेत.