Coronavirus : नागरिकांनो चिंता नको ! पुण्यात ‘या’ 6 गोष्टी सुरू राहणार, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यातील सर्वाधिक कोरोना ग्रस्तांची संख्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. कोरोनाचा पहिला रुग्णही पुण्यात आढळला होता. त्यामुळे राज्य सरकारचे पुणे आणि आजूबाजूच्या परिसरावर  विशेष लक्ष आहे. राज्यातील कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून शैक्षणिक संस्थां, हॉटेल, मॉल, जिम, थिएटरसह अनेक गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र, या बंदच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने काही गोष्टींना सुट दिली आहे. नागरिकांना सेवा देताना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी विशेष सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

पुण्यातूनच कोरोनाच्या विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केला. दुबईला फिरण्यासाठी गेलेल्या ग्रुपमधील लोकांमुळे राज्यात कोरोना वेगाने पसरला होता. त्यानंतर मुंबई, नागपूर या शहरातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधिताचा आकडा ४५ वर पोहोचला आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण पिंपर-चिंचवड आणि पुण्यात आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. लोकांची वर्दळ असणारी ठिकाण बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे.

हे सुरू राहणार

शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाची कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत

अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब यासह सर्व प्रकारचे वैद्यकीय नर्सिंग महाविद्यालये.

रेल्वे स्थानक, बस स्थानक, महानगर परिवहन थांबे आणि स्थानक, विमानतळ, रिक्षा थांबे.

अत्यावश्यक किराणा सामान, दुध/दुग्धोत्पादन विकणारी दुकानं, फळे व भाजपाला, मेडिकल, जीवनावश्यक वस्तुंची विक्री करण्यास मूभा.

सर्व हॉटेल/लॉज चालकांना आरोग्यविषयक खबरदारी घेऊन ग्राहकांना खाद्य पदार्थ बनवून देण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

विद्यार्थी खानावळ तसेच महाविद्यालये, वसतिगृहांमधील मेस परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवता येणार.

प्रसारमाध्यमांची (दैनिक, नियतकालिक, वृत्तवाहिन्या) कार्यालये सुरू राहतील