धक्कादायक ! ‘आंब्या’ची वाहतूक करणाऱ्या चालकाला ‘कोरोना’

सिंधुदुर्ग :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दररोज नवीन रुग्णांची भर पडत असल्याने राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. राज्यातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून कोकणात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. विशेष म्हणजे आढळून आलेला रुग्ण हा आब्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनावरील चालक असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. त्यातील एक रुग्ण यापूर्वीच बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. तर एका रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना राबवण्यात येत आहेत.
आज जिल्ह्यात सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे. हा रुग्ण 24 एप्रिल रोजी मुंबई येथून परत आला होता. त्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते.

मुंबई येथील हॉटस्पॉटमधून आल्यामुळे त्याचा 2 मे रोजी स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील या रुग्णाचे गाव कंटेनमेंट झोन केले असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.