खा. नवनीत राणा यांची सरकारकडे मागणी, म्हणाल्या – ‘कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आतापासूनच तयारी करा’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. अशातच आता तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने आतापासूनच तयारी करावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. यासाठी खासदार राणा यांनी एक व्हीडिओ जारी करत राज्य आणि केंद्र सरकारला विनंती केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वयोवृद्धांचा मृत्यूदर जास्त होता. आता दुसऱ्या लाटेत तरुणांचा मृत्यूदर जास्त आहे. त्यात तिसरी लाट ही लहान मुलांकरिता धोकादायक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकार आणि नागरिकांनी घ्यावी, असे खासदार राणा यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार लसीकरणावर भर देत आहे. तिसरी लाट ही लहान मुलांकरिता धोकादायक असल्याची भीती वर्तवली जात असल्याने लहान मुलांचंसुद्धा लसीकरण होणे गरजेचे आहे. तसेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याची काळजी घ्यावी. तिसऱ्या लाटेसाठी राज्यभरात प्रत्येक ठिकाणी मुलांसाठी 1 हजार बेड्सच कोविड सेंटर उभारावे. त्याठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याची उत्तम सुविधा असावी असे खासदार राणा यांनी म्हटले आहे. तिसरी लाट कुठल्याच राज्यात येऊ नये, पण जर आली तर त्यासाठी आपण तयार असले पाहिजे. तिसरी लाट कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आपल्याला वेगाने लसीकरण मोहीम राबवावे लागणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण झाल्यास कोरोना व्हायरसचे धोकादाय स्वरुप बदलेल आणि त्याला आटोक्यात आणता येईल. तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक खबरदारी घेत जागरूक राहणे गरजेचे असल्याचे खासदार राणा यांनी म्हटले आहे.