Coronavirus : ‘घाबरू नका, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत मुलांवर परिणाम होण्याचे संकेत नाहीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवघा देश कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत असतानाच आता तिसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसरी लाट ही मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी याचे कोणतेही पुरावे नाहीत असे म्हटले आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना संक्रमित करणार नाही असे मत व्यक्त केले आहे .

गुलेरिया म्हणाले की, अनेक संशोधकांनी लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे म्हटले आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले कोरोनाने प्रभावित झाली नाहीत. त्यांना लस दिली नाही. त्यामुळे ते तिसऱ्या लाटेत सर्वाधिक संक्रमित होतील, याचे काही पुरावे मिळाले नाहीत, असे गुलेरीया यांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात गेल्या 17 दिवसांत पहिल्यांदाच कमी रुग्ण सापडले आहेत. 15 आठवड्यांत चाचण्यांमध्ये 2.6 पटींनी वाढ झाली आहे. तर संक्रमण दर हा कमालीचा घसरला आहे. कोरोना संकटामुळे मुले आणि तरुणांवर झालेल्या परिणामवर बोलताना एम्सने म्हटले की, लहान मुलांना मानसिक तनाव, स्मार्टफोनची सवय आणि शैक्षणिक आव्हानांमधून अतिरिक्त नुकसान झाले आहे.