Coronavirus : पुणेकरांचं टेन्शन वाढलं ! ‘कोरोना’मुळं 24 तासात तिघांचा मृत्यू, मृतांची संख्या 5 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतामध्ये 70 हून अधिक जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे तर 3100 हून रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यात देखील परिस्थिती गंभीर बनली आहे. 24 तासात कोरोनामुळं तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 5 वर जाऊन पोहचली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून प्रशासनाकडून वेळावेळी सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधितांची संख्या आता 661 वर जाऊन पोहचली आहे.

पुण्यात 24 तासात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांचे वय अनुक्रमे 60 आणि 69 होते. 52 वर्षाच्या एका पुरूशाचा देखील आजच मृत्यू झाला आहे. 60 वर्षाची महिला काही दिवसांपुर्वी नायडू रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. मात्र त्यावेळी तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता म्हणून तिला रूग्णालयातून सोडून देण्यात आले होते. पण प्रकृती बिघडल्याने तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह ससून रूग्णालयात दाखल करण्यात आला. तिचा स्वॅब टेस्टसाठी पाठविण्यात आला. आता तो अहवाल प्राप्त झाला असून तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. ससून रूग्णालयातच 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर उच्चरक्तदाब आणि मधुमेह झाल्याने उपचार चालु होते. त्याचा देखील शनिवारी रात्री उशिरा अहवाल आला असून त्यामध्ये त्यास कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळं पुण्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुणेकरांची चिंता वाढली आहे.